मुंबई : मागील दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्याचं राजकारण चांगलच ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवारांनीही बंड करत पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. त्यावरून मंगळवारी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अजित पवारांचा जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का? असा सवाल मनसेने केला आहे.
यात अजित पवारांसोबत असलेल्या भुजबळ, सुनील तटकरे, वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही मनसेने जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना दिल्यानंतर मनसेनं एकापाठोपाठ एक ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं. त्यावेळी विरोधीपक्षात असणाऱ्या अजित पवारांनी खणखणीत भाषण करत टीका केली होती. अजित पवारांच्या भाषणातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मनसेनं पोस्ट केलेल्या व्हिडीओत काय आहे?
शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी अजित पवार विरोधीपक्षनेते होते. त्यावेळी त्यांनी सडकून टीका केली होती. तो अजित पवारांचा व्हिडीओ मनसेनं ट्वीटरवर (एक्स) पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला. शिवाजी पार्कमध्ये काढलेला पक्ष महाराष्ट्रात सर्वदूर पोहचवला. त्यांचाच पक्ष काढून घेतला. त्यांचंच चिन्ह काढून घेतलं. हे जरी निवडणूक आयोगानं दिलं असले तरी जनतेला पटलेय का? त्याचाही विचार झाला पाहिजे? धमक होती तर पक्ष काढा ना? तुम्हाला कुणी अडवलं होतं? असे अजित पवार व्हिडीओत म्हणाले आहेत.
‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का?
वाह रे पट्ठ्या…! ???? pic.twitter.com/ZXcOk6y6oy
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 7, 2024
मनसेची नेमकी पोस्ट काय ?
बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ… अशी पोस्टही मनसेच्या एक्स खात्यावरुन करण्यात आली आहे.
बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ !… pic.twitter.com/qg916aUC3y
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 6, 2024