मुंबई: राजकारण कितीही झालं तरी कुटुंबात कधीही राजकारण येऊ न देणाऱ्या पवार कुटुंबियांमध्ये फूट पडली गेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून भाजप आणि शिवसेना यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट झाले आहेत. त्यानंतर शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर पवारांचा नातू त्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यांनी आज केलेल्या फेसबुक पोस्टने राजकीय पंडितांसह सर्वांचे लक्ष वेधलं आहे. त्यामुळे युगेंद्र पवार हे रोहित पवार यांच्यानंतर राजकारणामध्ये सक्रिय होण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. युगेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये शरद पवार यांच्या सोबतचा फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनने लक्षवेधी ठरत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दिल्लीपुढे न झुकण्याचा छत्रपती शिवरायांनी शिकविलेला स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय असा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाच्या नव्या चिन्हाचे स्वागत करणारी पोस्ट सुद्धा शेअर केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटांमध्ये सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.