मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणे अजय महाराज बारस्कर यांना चांगलेच महागात पडले आहे. अजय महाराज बारस्कर यांची प्रहार जनशक्ती पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बारस्कर हे प्रहारचे कार्यकर्ते आहेत, आणि प्रहारने सुरूवातीपासून जरांगे यांना पाठिंबा दर्शवला आहे. असे असताना वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
तसेच बारस्कर यांच्या विधानाशी प्रहार पक्ष सहमत नाही, त्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नसल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष महेंद्र जवंजाळ यांनी निवेदन काढून ही माहिती दिली. बारस्कर यांनी केलेल्या एकही विधानाशी आमचा काहीच संबंध नाही. अजय महाराज बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पार्टी आणि प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्यात येत आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
प्रहारकडून नेत्यांना आदेश
बारस्कर यांनी केलेल्या विधानांनंतर नेते आणि कार्यकर्त्यांना बच्चू कडूंनी नवा आदेशही दिला आहे. पक्षातील कोणत्याही व्यक्तीने मनोज जरांगे पाटील, मराठा नेते आणि मराठा आरक्षणावर भाष्य करू नये. तसं केल्यास त्या व्यक्तीला पक्षातून काढलं जाईल. त्याचा पक्षाशी काहीच संबंध राहणार नाही, अशी तंबीच बच्चू कडू यांनी दिली आहे, असेही या पक्षादेशात म्हटले आहे.
काय म्हणाले होते बारस्कर?
अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषद थेट जरांगे यांची अक्कलही काढली होती. जरांगेमुळे भुजबळ हे मोठे होत आहेत. जरांगे हे स्वत:ला देव समजू लागले आहेत. जरांगे यांना कायदा माहीत नाही. त्यांना बोलता येत नाही. त्यांना आयुष्यभर आंदोलनच करायचे आहे. त्यांना मोठ्ठे व्हायचे आहे. केवळ प्रसिद्धी मिळवायची आहे, अशी टीका अजय महाराज बारस्कर यांनी केली आहे. मनोज जरांगेंना सरकारला वेठीस धरायचे आहे. जरांगे यांच्या मागे भुजबळ असल्याचा संशय वाटतो. भुजबळ त्यांच्यामुळेच मोठे झालेत, असा दावा करतानाच वाशी आणि लोणावळ्यात बैठक झाली. बंद दाराआड झालेल्या बैठकीत काय झालं हे मला माहीत आहे, असा दावा त्यांनी केला होता. मला धमक्या येत आहेत. पोलिसांना विनंती आहे की त्यांनी मला सुरक्षा द्यावी, असे बारस्कर म्हणाले.