मुंबई : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजाने एल्गार पुकारला आहे. धनगर समाजाने आरक्षणासाठी सरकारला ५० दिवसांचा कालावधी दिला होता. ही मुदत संपली आहे. धनगर समाजाचे नेते उद्यापासून चौंडी येथे उपोषणाला बसणार असून, राज्यभरात २० ठिकाणी आमरण उपोषणाला आणि अनेक गावांमध्ये साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे.
धनगर समाजाच्या नेत्यांनी २१ दिवस उपोषण केले होते. त्यानंतर सरकारकडून मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सरकारने दिलेला ५० दिवसांचा कालावधी आता संपला आहे. धनगर समाजाचे नेते आणि यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोलतले याबाबत माहिती देताना म्हणाले की, धनगर आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी उद्यापासून पुन्हा चौंडी येथे उपोषण करणार आहे. राज्य सरकारने धनगर समाजाची थट्टा केली गेली. सरकारने शब्द देऊनही अद्याप अभ्यास समिती देखील नेमली नाही. यासाठीच उपोषणाचे अस्त्र उगारले आहे.
दोललते म्हणाले की, अंबड येथे ओबीसी मेळावा होत आहे. राज्यात २० ठिकाणी आमरण उपोषण आणि अनेक गावांमध्ये साखळी उपोषण करण्यात येईल.