मुंबई : भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यामध्येच गोळीबार केला. धक्कादायक म्हणजे हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या केबिन मधेच हा प्रकार घडला.
या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड यांनी होय मीच गोळीबार केला आहे, असं प्रसारमाध्यमांशी बोलताना कबूल केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाले आमदार गणपत गायकवाड?
दरम्यान, या गोळीबारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गणपत गायकवाड म्हणाले की, पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मला केलेल्या कृत्याचा काही पश्चाताप नाही. माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत होती.
त्यामुळे माझ्यासमोर पर्याय नव्हता. पोलिसांनी हिंमत करून मला अडवले. मात्र त्यांना जिवे मारण्याचा माझा हेतू नव्हता. पण पोलिसांसमोर माझ्यावर जर कुणी हल्ला करत असेल तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असं करणं गरजेचं होतं, असे गणपत गायकवाड म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप
तसेच गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहेत. ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील.
आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच मी मला होत असलेल्या त्रासाबाबत भाजपामधील वरिष्ठांना कल्पना दिली होती. ही लोकं माझा वारंवार अपमान करतात. मी केलेल्या कामांच्या ठिकाणी श्रीकांत शिंदेंच्या नावाचा फलक लावला जातो, असाही आमदार गायकवाड यावेळी म्हणाले.