मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी इमारतीवरून उडी मारून आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभिनेता अरबाज खान हा सध्या अरोरा कुटुंबासोबत असल्याची माहिती समोर येत आहे.
अधिक माहिती अशी की, मुंबईतील वांद्रे येथील अल्मेडा पार्क या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली असल्याचे समजताच एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासा दरम्यान पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नसून अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आत्महत्येमागील नेमकं कारण काय? ते अद्याप समोर आले नाही.
मलायका अरोरा पुण्याहून मुंबईकडे रवाना…
अभिनेत्री मलायका अरोरा ही काही कामानिमित्ताने पुण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच मलायका तातडीने मुंबईसाठी रवाना झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अरोरा कुटुंबातील सदस्यांना धीर देण्यासाठी मलायकाचा पूर्व पती आणि अभिनेता अरबाज खान हा अरोरा यांच्या घरी दाखल झाला असल्याचे वृत्त आहे.