मुंबई : दादरमधील एका प्रसिद्ध हाडांच्या डॉक्टरची अपॉईंटमेंट घेण्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक गुगलवर शोधणे एका अभिनेत्याला महागात पडले. सायबर ठगांनी या अभिनेत्याला एक ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडत त्यांच्या खात्यातून ७७ हजार रुपये लंपास केले आहेत. अभिनेत्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.
लोखंडवाला परिसरात राहत असलेले अभिनेते इक्बाल याकुब मोहम्मद (५९) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, २६ मे च्या सायंकाळी ते दादरमधील एका प्रसिद्ध हाडांच्या डॉक्टरचा संपर्क क्रमांक गुगलवर शोधत होते. या वेळी त्यांना डॉक्टरच्या नावाने एक मोबाईल नंबर मिळाला. त्या नंबरवर संपर्क करत डॉक्टरांची अपॉईंटमेंट घ्यायची असल्याचे सांगितले. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने अपॉईंटमेंट घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागेल, असे सांगून फोन ठेवला. काही वेळात अन्य एका नंबरवरून इक्बाल यांना कॉल आला. त्याने मोबाईलवर अपॉईंटमेंट बुकिंग ॲपची लिंक पाठवली. इक्बाल यांनी लिंक ओपन करत नोंदणी फी म्हणून १० रुपये पाठवले. त्यानंतर लगेचच खात्यातून व्यवहार होत पैसे जाऊ लागले. त्यानंतर इक्बाल यांनी ओशिवरा पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची तक्रार दिली आहे.