कल्याण : कल्याण येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नानंतर हनीमूनला काश्मीरला जाण्यावरून सासऱ्याने जावयावर असिड हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी १९ डिसेंबर रोजी कल्याण येथे घडली आहे. इबाद फालके असं अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरे जकी खोटाल असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जकी खोटाल यांच्या मुलीशी इबाद फालकेचं नुकतच लग्न झालं होत. त्यानंतर इबादने हनीमूनला काश्मीरला जाण्याचं नक्की केले होते. मात्र, जकी खोटाल यांनी जावई आणि आपल्या मुलीने काश्मीरला जाण्यापूर्वी मक्का-मदिना या ठिकाणी जावं, असा आग्रह जावई इबादकडे धरला होता. इबाद मात्र काश्मीरला जाण्यासाठीच ठाम होता.
दरम्यान, या कारणांवरून दोघांमध्ये बाचाबाच झाली. तरीदेखील इबादने मधुचंद्रासाठी काश्मीरला जाण्याच निश्चित केलं. मात्र, जकी यांनी त्याला विरोध दर्शवला. मागच्या महिन्याभरापासून त्यांच्यात ही धुसफूस सुरु होती. अखेर सासरे जकी यांनी जावई इबादला कल्याण येथील लाल चौकी भागात गाठलं आणि त्यावेळी त्याच्यावर अॅसिड हल्ला केला. त्यामुळे त्याचा जावई गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यानंतर जकी खोटाल घटनास्थळावरून पळून गेले. पुढील तपास बाजारपेठ पोलिस कल्याण करीत आहेत.