मुंबई : मुंबईमधून पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. एका कारने तीन जणांना चिरडले आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. कांदिवलीमध्ये ही घटना घडली आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी मोटार चालविण्यास शिकविणारा आणि शिकणाऱ्या अशा दोघांनाही कांदिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना २१ जून रोजी घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिकाऊ कार चालकाने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबले, त्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कांदिवलीच्या माय फेअर ग्रीन सोसायटीजवळ सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. कांदिवली परिसरात राहणारे टॅक्सी चालक राजेंद्र गुप्ता हे त्यांचे मित्र सुरेंद्र गुप्ता यांना शुक्रवारी कार चालवण्यास शिकवत होते.
सुरेंद्रजवळ कार चालवण्यासाठीचा परवाना नव्हता. तरी देखील तो विनापरवाना कार चालवण्यास शिकत होता. यावेळी सुरेंद्रने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबल्याने कार वेगाने पुढे गेली आणि कारने तिघांना चिरडले. कारची जोरात धडक बसल्यामुळे एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींवर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी हलगर्जीपणे कार चालवल्याप्रकरणी कारमालक सुरेंद्र गुप्ता आणि चालक राजेंद्र गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.