मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रचार सभा होत आहेत. अनेक नेत्यांच्या मुलाखती सुद्धा पार पडत आहेत. अनेक नेते दावे प्रतिदावे करताना दिसत आहेत. अशातच अजित पवार यांनी अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात पहाटेचा शपथविधी पार पडला होता. या शपथविधीला पाच वर्ष उलटल्यानंतर आता अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सत्तास्थापणेसाठी एका उद्योगपतीच्या घरी बैठक पार पडली होती. या बैठकीला अमित शाह, देवेंद्र फडणवीस, शरद पवार साहेब, प्रफुल पटेल असे सगळे उपस्थित होते. या बैठकीचा उद्योगपती देखील हिस्सा होता,असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता. अजित पवारांच्या या गौप्यस्फोटावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे या माध्यमांशी संवाद साधला, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया दिली. अशी कोणतीही बैठक झाली, याची मला माहिती नाही. पहाटेच्या शपथविधीबाबत आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं. हे मी अनेकदा बोलेले आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच मी त्या दिवशी झोपले होते. त्यावेळी सदानंद सुळे यांनी मला उठवून याबद्दल टीव्हीवर दाखवलं. मला आणि आमच्या पक्षाला या पहाटेच्या शपथविधीबद्दल आणि मिटींगबद्दल काहीही माहिती नाही. ही मिटींग झाली की नाही? आणि कुठे झाली? या सगळ्याचे उत्तर अजित पवार देऊ शकतात, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
..यासाठी त्यांनी उद्योगपतीचा वापर केला : संजय राऊत
उद्योगपतीला सरकार नको होतं. मुंबई महाराष्ट्र त्यांना गिळायचा होता, म्हणून नरेंद्र मोदी अमित शहा यांनी शिवसेना फोडली. यासाठी त्यांनी उद्योगपतीचा वापर केला, असे संजय राऊत यांनी म्हटले. सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवारच सांगत आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्यासाठी उद्योगपतीचा वापर केला. त्यामुळे अजित पवार हे कबूल करत आहेत यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो का? असे राऊत म्हणाले. ही मुंबई आणि महाराष्ट्र उद्योगधंदे यांना विकण्याचा डाव नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी केला आणि तो यशस्वी झाला म्हणून ही जी आमची लढाई सूरू आहे,असे संजय राऊत यांनी सांगितले.