पालघर : पालघरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मोखाडा तालुक्यातील कारेगावमधील आश्रम शाळेत विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. दोन लाडू घेतले म्हणून विद्यार्थ्याला बेशुद्ध पडेपर्यंत काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसारत मोठी खळबळ उडाली आहे. मारहाण करणाऱ्या शिक्षकांविरोधात तक्रार करू नये म्हणून, पीडित विद्यार्थ्याच्या आई वडिलांवर शिक्षकांकडून दबाव आणला जात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एका शासकीय आश्रम शाळेत एका विद्यार्थ्याला दोन लाडू घेतले म्हणून शिक्षकाने बेदम मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे हा विद्यार्थी बेशुद्ध पडेपर्यंत या निर्दयी शिक्षकाने त्याला काठीने मारहाण केली आहे. यानंतर अधीक्षक आल्यानंतर या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मोखाडा तालुक्यातील कारेगाव येथील शासकीय आश्रम शाळेत नववीत शिकणाऱ्या रुद्राक्ष दत्ता पागी असं मारहाण करण्यात आलेल्या मुलाच नाव आहे. ललित अहिरे या शिक्षकांनी ही मारहाण केल्याचं प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळं शासकीय आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तुझ्या हातात दोन लाडू कसे? असं विचारत रुद्राक्षला बेदम मारहाण
सोमवारी रुद्राक्ष नेहमीप्रमाणे जेवण घेण्यासाठी गेला त्यावेळेस त्याच्या हातात दोन लाडू होते. तुझ्या हातात दोन लाडू कसे? याचा जाब विचारत रुद्राक्षला या शिक्षकाने बेदम मारहाण केली. मात्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शिक्षकांविरोधात तक्रार करू नये म्हणून पीडित विद्यार्थ्याच्या आई वडिलांवर शिक्षकांकडून दबाव आणला जात होता.