मुंबई : महाराष्ट्र राज्य स्त्री सन्मानाच्या आणि स्त्रियांच्या हक्काच्याबाबत नेहमी आग्रही राहिलेलं आहे. याबाबत महाराष्ट्राने नेहमीच प्रागतिक भूमिका घेतलेली दिसून येते. देशातील स्त्री शिक्षणाचा पाया सुद्धा याच महाराष्ट्राच्या भूमीत रचला गेला आहे. महिन्यांपूर्वी राज्य सरकारनं सरकारी कागदपत्रांमध्ये आईचं नाव देखील प्राधान्यानं नोंदवलं जावं यासाठी निर्णय घेतला होता. आता याच पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागानं सुद्धा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सातबारा उताऱ्यावर देखील आईचं नाव नोंदवलं जाणार आहे. 1 नोव्हेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
भूमी अभिलेख विभागाचा प्रस्तावात काय आहे..
महाराष्ट्रात 1 मे 2024 नंतर ज्यांचा जन्म झाला असेल त्यांच्या नावावर जमीन खरेदी केल्यास त्याची नोंद करताना संबंधिताच्या आईचे नाव सातबाऱ्यावर नोंदवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याचवेळी वडिलांचं नाव सातबारा उताऱ्यावर नोंदवणं बंधनकारक असणार नाही.
फेरफारवर देखील आईचं नाव नोंदवलं जाणार..
पुढील काळात फेरफार करण्यात आल्यास त्यावर देखील आईचं नाव लावलं जाणार आहे. तर विवाहितांना वडिलांचं किंवा पत्नीचं नाव लावण्याची मुभा दिली जाणार आहे. राज्य सरकारकडे भूमी अभिलेख विभागानं प्रस्ताव पाठवला आहे. राज्य सरकारनं मान्यता दिल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.