मुंबई : नवी मुंबईत शाळेतील शिपायाने 17 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढंच नाही तर 23 वर्षीय आरोपी तरुणाने मुलीला गर्भवती करत नंतर तिला आत्महत्येला भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली आहे. अटकेनंतर कोर्टात हजर केलं असता 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी शाळेत शिपाई म्हणून काम करतो. शिपाई आरोपीने 17 वर्षीय तरुणीशी कथितपणे मैत्री केली होती. यानंतर त्याने वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत गर्भवती केलं. अखेर त्रासलेल्या मुलीनं 28 नोव्हेंबर रोजी घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली.
दरम्यान, मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला गोवंडीतून अटक केली. आरोपीविरोधात कलम 305 (अल्पवयीन मुलीला आत्महत्येसाठी भाग पाडणे), 376 (2) (वारंवार अत्याचार) आणि लहान मुलांना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणाऱ्या पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कोर्टात हजर केलं असता 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.