मुंबई: मुंबईच्या मिरा रोड परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि मानवी मनाला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अश्लील व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल दोन महिने सहा नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याचा हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता नववीत शिकणारी असून ती मिरा रोड परिसरात आपल्या आईसोबत राहते. जून महिन्यात एका २५ वर्षीय तरुणाने ही मुलगी कपडे बदलत असताना तिचा चोरून अश्लील व्हिडिओ तयार केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केला.

या प्रकरणाची विकृती इथेच थांबली नाही, तर मुख्य आरोपीने हा अश्लील व्हिडिओ आपल्या इतर मित्रांसोबतही शेअर केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण सहा जणांच्या हाती हा व्हिडिओ लागला. या सर्व नराधमांनी मुलीला व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवून तिच्यावर दोन महिने सतत अत्याचार केला.

पीडित मुलगी गेल्या दोन महिन्यांपासून हा अमानुष अत्याचार निमूटपणे सहन करत होती. अखेर हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर काशिगाव पोलीस ठाण्यात सहाही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेसह (BNS), पोक्सो (POCSO) कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) अत्यंत गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटना उघडकीस येताच काशिगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर उर्वरित चार आरोपींचा कसून शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या अत्यंत घृणास्पद घटनेमुळे मिरा रोड परिसरात आणि राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.







