मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या नावाने कतारच्या राजघराण्याकडे पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. राहुल कांत असं आरोपीचं नाव असून पोलिसांकडून राहुलची चौकशी सुरू आहे. व्हॉट्सऍपच्या माध्यमातून प्रफुल पटेल यांचा डीपी लावून कतारच्या रॉयल फॅमिलीकडे राहुल कांत पैसे मागत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुलने 20 जुलैला कतारच्या राजघराण्याकडे व्हॉट्सऍपच्या माध्यमातून मेसेजकरून पैसे मागितले. यानंतर कतारच्या राजघराण्याने प्रफुल पटेल यांच्याशी संपर्क केला आणि या घटनेची माहिती दिली. यानंतर प्रफुल पटेल यांनी याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना दिली.
प्रफुल पटेल यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी याबाबत महाराष्ट्र सायबर क्राईमकडे माहिती दिली. यानंतर सायबर क्राईम ब्रांचने आयटी ऍक्ट 66D अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राहुल कांतला अटक केल्यानंतर तपासामध्ये राहूलने आपण कतारच्या राजघराण्याकडे पैसे मागितल्याचं कबूल केलं आहे.