मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहे. तसेच या मुद्यावरून महायुतीमध्ये सगळं काही आलबेलं नसल्याच बोललं जात आहे. अशातच गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वादावादी झाल्याची चर्चा रंगली आहे. या वादावादीतून अजित पवारांनी कॅबिनेटची बैठक अर्ध्यावर सोडली असल्याच बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
कॅबिनेटच्या बैठकीतून अजित पवार लवकर निघून गेल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात आली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. महायुती सरकारमध्ये वाद हे नेहमीचेच आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. राज्याच्या हितासाठी नाही तर स्वत:च्या हितासाठी वाद सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. अजित पवारांना महायुतीमधून बाजूला सारण्याचे पूरेपूर प्रयत्न सुरू असावेत असेही वडेट्टीवार यांनी म्हटले. तर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा या मुद्द्यावरून महायुतीव टीका केली. महायुतीमध्ये कधीच आलबेल नव्हते. हे फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठीच करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
अजित पवार यांनी नेमकं काय म्हटले?
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास अवघे काही तास उरले. त्यापूर्वी गुरुवारी कॅबिनेटची बैठक घेण्यात आली. या बैठकीतून अवघ्या 10 मिनिटांतच उपमुख्यमंत्री अजित पवार निघून गेल्याची माहिती समोर आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र कालची कॅबिनेट लवकर सोडून गेलो नाही, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. कॅबिनेटनंतर लातूरमध्ये नियोजित कार्यक्रम होता. कॅबिनेटमध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्यानंरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगून नियोजित दौऱ्यासाठी निघालो होतो, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.