मुंबई : मुंबईमध्ये एक मोठा अपघात घडला आहे. दुचाकी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात परळ ब्रिजवर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरला जोरदार आदळली. बाईकवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघांचाही या घटनेत मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन तरुणींसह एका तरुणाचा समावेश आहे. तनिष पतंगे (वय 24), रेणुका ताम्रकर ( वय 25 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. तर एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेल ब्रिजवर दामोदर हॉल समोर सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. दुचाकीवरून दोन तरुणी आणि एक तरुण प्रवास करत होते. साउथ बॉण्डने प्रवास करत असताना डिव्हायडरला धडक बसून नॉर्थ बॉण्डने जाणाऱ्या डंपरवर बाईक धडकली. दोन वाहनांची धडक इतकी जोरदार होती की बाईकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.
तर ट्रकच्या समोरील भागाचं देखील नुकसान झालं आहे. धडकेनंतर दुचाकीवरील तिघांना रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमींना KEM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलं. डंपर चालकाने स्वत:पोलीस स्टेशनला जाऊन अपघाताची सविस्तर माहिती दिली.