मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघडीला दारुण पराभव पत्करावा लागला असतानाच आता मविआला मोठा धक्का बसला आहे. समाजवादी पार्टीने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायचं नसल्याचे कारण देत अबू आझमी यांनी हा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय ते विधानसभेत वेगळा गट निर्माण करणार असल्याचेही अबू आझमी यांनी स्पष्ट केले. एकीकडे मारकडवाडी आणि नागपूर अधिवेशनासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी विरोधक ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर जात आहेत. तर दुसरीकडे विधानसभेत शपथ घेतल्यानंतर अबू आझमी यांनी मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमकं काय म्हणाले अबू आझमी?
आमदारकीची शपथ घेतल्यानंतर अबू आझमी यांनी मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अबू आझमी म्हणाले की, मी महाविकास आघाडीमधून बाहेर पडत आहे. शिवसेनेबरोबर आम्ही राहणार नाही. बाबरी मशीदबाबत आमचा अपमान झाला आहे. माझे सर्व आमदार वेगळा गट स्थापन करू. मी आज शपथ घेतली आहे. मी अजित पवार यांना भेटलो आहे. लवकरच पुढचा निर्णय कळवतो. सध्या तरी मविआतून बाहेर पडत आहे.
आमदारांचा शपथविधी, मविआला धक्का
विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज मुंबईमध्ये सुरूवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभेचे सदस्य उपस्थित होते. आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला आहे. विरोधी पक्षाने पहिल्याच दिवशी आक्रमक पवित्रा घेत शपथविधीस नकार देत सभात्याग केला. अबू आझमी यांनी मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मविआला मोठा धक्का बसला आहे.