मुंबई: केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ते जमा झाले असून आता 23 व्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, काही लाभार्थ्यांना पुढील हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे.

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेत पडताळणी प्रक्रिया अधिक कडक केली आहे. पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी लाभार्थ्यांची माहिती तपासली जात आहे. चुकीची माहिती, अपूर्ण नोंदी किंवा कागदपत्रांतील तफावत असल्यास हप्ता अडकू शकतो.
याशिवाय, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना योजनेचा पुढील हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे ई-केवायसी वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
जमिनीची कागदपत्रे आणि शेतकऱ्यांची माहिती सरकारी नोंदींशी जुळणेही महत्त्वाचे आहे. जमिनीची पडताळणी अपूर्ण असल्यास किंवा माहिती खात्याशी लिंक नसेल तर लाभ रोखला जाऊ शकतो.
शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक खाते तपशील आणि इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी. तसेच ई-केवायसी आणि जमिनीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, 23 वा हप्ता कधी जमा होणार याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी पुढील कालावधीत याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे. सरकारचा उद्देश पात्र शेतकऱ्यांपर्यंतच लाभ पोहोचवण्याचा असल्याचे सांगितले जात आहे.







