मुंबई: एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो कोण असेल हे संघ ठरवेल, असं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. याबरोबरचं बंद दाराआड याबाबत संघाची चर्चा झालेली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर राज्यात उलट सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ‘वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही’ असं म्हणत राऊतांना टोला लगावला आहे.
खासदार राऊत यांनी मोदींच्य वारसदाराच्या केलेल्या वक्तव्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही. ते अजून बरेच वर्ष काम करणार आहेत. आम्ही सगळे 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडे बघतो आहोत. त्यामुळे आता उत्तराधिकारी शोधण्याबाबतची चर्चा करणे योग्य होणार नाही.
मुख्यमंत्री फडणविसांचा राऊतांना टोला…
फडणवीस पुढे म्हणाले, आपल्या भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही. ही सगळी मोगली संस्कृती आहे. ज्यात वडील जिवंत असतानाच मुलं असा विचार करतात. त्यामुळे आता कोणाचाही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही. हा माझा विषय आहे, मात्र, माझा त्याच्याशी संबंध नाही. असही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
खासदार संजय राऊत काय म्हणाले होते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी(30 मार्च) नागपूरच्या रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या राजकीय वारसादाराबद्दल भाष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारसदार कोण असेल? असा प्रश्न संजय राऊतांना माध्यमांकडून विचारला असता यावर संजय राऊतांनी उत्तर दिले होते. ते म्हणाले होते, तो नेता बहुतेक महाराष्ट्रातीलच असेल. हा नेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असेही राऊत माध्यमांना म्हणाले होते.