मुंबई : नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नात्यात अडथळा ठरत असल्याच्या रागातून एका नराधमाने दोन वर्षांच्या सावत्र मुलीवर बलात्कार करून, या चिमुकलीच्या नाजूक भागात लाटणे घुसवून तिचा गळा आवळत हत्या केल्याची घटना घडली आहे. हि घटना ८ नोव्हेंबर रोजी मानखुर्द येथे दुपारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधामाला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चिमुकलीच्या आईने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर दोघी मायलेकी आरोपीसोबत राहत होत्या. आरोपीला ही मुलगी त्यांच्या नात्यामध्ये अडथळा वाटू लागली. त्यावरून त्या दोघांमध्ये सारखे वाद निर्माण होऊ लागले. या दोघांमधील भांडणाचा राग आरोपी त्या चिमुकलीवर काढू लागला.
दरम्यान, या मुलीची आई शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाणे घरकामासाठी बाहेर गेली. त्यावेळी आरोपीने मिळालेल्या संधीचा फायदा उचलत चिमुकलीवर बलात्कार केला. तसेच चिमुकलीच्या नाजूक भागात लाटणे घुसवून, तिचा गळा आवळून हत्या केली आहे. दुपारच्या वेळी मुलीची आई घरी परतली तेव्हा मुलगी बेशुद्धावस्थेत होती. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
बलात्कार करून सावत्र बापाचे भयानक कृत्य
या मुलीच्या अंगावर मारहाणीच्या तसेच गळा आवळल्याच्या खुणा पोलिसांच्या निदर्शनास आल्या आहेत. तर तिच्या नाजूक भागावर जखमा देखील होत्या. तेथून रक्तस्त्रावही होत होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पोलिसांनी आरोपीला जाब विचारताच त्याने मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याची कबुली दिली आहे. भारतीय न्याय संहितेसह पोक्सो कायद्यातील गंभीर कलमांनुसार आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.