मुंबई : जगभरातील अनेक जण खाण्याचे शौकीन आहेत. त्यामुळे खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ ते ट्राय करत असतात, मात्र अनेकदा खाण्यात विचित्र गोष्टी किंवा धक्कादायक पदार्थ आढळलेल्या घटना समोर आल्या आहेत. सध्या समोर आलेली घटना खूपच धक्कादायक आहे. मानखुर्द भागात (Mankhurd area) शॉरमामधून (Shawarma) विषबाधा (Poisoning) झाल्यामुळे एका १९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. प्रथमेश भोकसे असे त्या मुलाचे नाव आहे.
सध्या रस्त्यात ठिकठिकाणी शॉरमाच्या गाड्या दिसतात. मानखुर्दमधील महाराष्ट्र नगरमध्ये राहाणाऱ्या प्रथमेश भोकसे याने त्या भागातील एका स्टॉलवर शॉरमा खाल्ला. त्यानंतर त्याला त्रास होऊ लागला. त्या ठिकाणी शॉरमा खाणाऱ्या इतर दहा ते बारा जणांना त्रास सुरु झाला. या लोकांना उलट्या, जुलाब आणि मळमळीचा त्रास होऊ लागला. प्रथमेशला शुक्रवारी तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचार सुरु असताना त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू होताच शॉरमा विक्रेत्याविरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना शॉरमातील चिकन खराब असल्याचा संशय आहे. हा खराब शॉरमा खाल्ल्याने प्रथमेश भोकसे याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. ट्रोम्बे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. त्या लोकांनी शॉरमासाठी लागणारे मांस कुठून आणले होते, त्याची चौकशी पोलीस करत आहेत.