मुंबई : विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केला आहे. अॅम्बुलन्समधून पैसे खाण्याचा प्रकार महायुतीत सुरु आहे, सनदी अधिकाऱ्यांना बदलीची भीती दाखवून कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यासाठी 10 दिवस टेंडरची मुदत ठेवली होती, या घोटाळ्यात एका मंत्र्यांचा आणि त्याच्या नातेवाईकाचा समावेश असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
’10 दिवस टेंडरची मुदत ठेवली होती, ज्यात वर्किंग दिवस हे फक्त 6 होते. टेंडरची रक्कम फुगवण्यात आली होती. सरकार 1529 अॅम्बुलन्स खरेदी करणार आहे’, असे विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
साधारणपणे कार्डिएक सुविधा असलेल्या एका अँम्ब्युलन्सची किंमत 50 लाखाच्या आसपास असते. 1,529 अँम्ब्युलन्सचे प्रति अँम्ब्युलन्स 50 लाख या प्रमाणे एकूण 764 कोटी 50 लाख रूपये होतात. 800 कोटी रूपयात होणाऱ्या या कामासाठी 8 हजार कोटी खर्च करण्यात आले आहेत. अॅम्ब्युलन्समधून पैसे खाण्याचा नवा धंदा सरकारमधील काही मंडळींनी सुरू केला आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. त्याशिवाय, अँम्ब्युलन्स पुरवठ्याचे टेंडर सरकारने रद्द करावे, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी ही आमची मागणी आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
आमच्या सरकारच्या काळात टेंडरची 41 दिवस मुदत असायची. आता त्यात बदल करण्यात आला आहे. सबंधित ठेकेदार सेवा बरोबर देतो की नाही, चालक बरोबर आहेत की नाही याची कुठलीही खातरजमा न करता सरसकट अट ठेवलेली नाही. क्षमता आणि गुणवत्ता न तपासता ठेकेदाराला हे काम दिलेलं आहे. एका मंत्र्यांचा आणि त्याच्या नातेवाईकाची यामध्ये समावेश आहे तेही आम्ही समोर आणू. मी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहून चौकशीची मागणी करणार आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.