मुंबई: कल्याण पूर्व येथील कोळशेवाडी परिसरात एका ७ वर्षांच्या निष्पाप मुलीवर ५५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

आरोपी जुमयी आली शेख (वय ५५) याने पीडित मुलीला ‘टोमॅटो देतो’ असे आमिष दाखवून आपल्या सोबत नेले. त्यानंतर आरोपीने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीने घरी परतल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. ही माहिती मिळताच मुलीच्या पालकांनी तात्काळ कोळशेवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

तक्रार प्राप्त होताच कोळशेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीवर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
या घटनेची माहिती पसरताच स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यासमोर गर्दी करत आरोपीला फाशीची किंवा कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. अशा नराधमांना जलदगती न्यायालयात खटला चालवून त्वरित शिक्षा देण्यात यावी, अशी भूमिकाही संघटनांनी मांडली आहे.
कल्याण पूर्व भागात अशा स्वरूपाच्या घटना वारंवार घडत असल्याने स्थानिक रहिवाशांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, मुलींच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.







