ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकावर बुधवारी तब्बल 54 डेटोनेटर सापडले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडण्याच्या आतच बॉम्बशोधक पथकाने ही स्फोटके ताब्यात घेतली. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील सरकत्या जीन्याखाली डेटोनेटरचे हे बॉक्स ठेवण्यात होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढचा मोठा अनर्थ टळला. मात्र रेल्वे स्थानकात स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे.
कल्याण रेल्वे स्टेशनमधील फलाट क्रमांक एकवर बुधवारी सकाळी 11.30 वाजता दोन खोक्यांमध्ये भरलेली एकूण 54 स्फोटके (डिटोनेटर्स) कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जप्त केली. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान कल्याण पश्चिम फलाट क्रमांक 1 वर दोन खोके असून त्यात स्फोटक सदृश्य ज्वलनशील पदार्थ असल्याची माहिती रेल्वे स्थानकातील एका सफाई कामगाराने कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली. कल्याण लोहमार्ग विभागाचे उपायुक्त मनोज पाटील, कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तातडीने रेल्वे स्थानकात सहकाऱ्यांसह येऊन खोक्यांची तपासणी करून ते दोन्हीही खोके ताब्यात घेतले.
त्यानंतर तातडीने पोलिसांच्या डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. श्वानाच्या साहाय्याने या खोक्यांची तपासणी करण्यात आली. ही स्फोटके रेल्वे स्थानकात कोणत्या कारणासाठी आणली होती, ती कोणी आणून ठेवली. स्फोटके रेल्वे स्थानकात आणून ठेवण्याचा उद्देश काय होता, अशा विविध अंगांनी पोलिसांच्या विशेष पथकाने तपास सुरू केला आहे.