मुंबई : मुंबईच्या मुलुंड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये अडकून पाच वर्षांच्या मुलाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कबीर कनोजिया (वय-५) असे मृत मुलाचे नाव असून तो मुलुंड येथील आंबेडकर नगर परिसरात राहत होता. मुलाच्या मृत्यूनंतर नवघर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मुलुंडमधील म्हाडा वसाहत परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
कबीरच्या वडिलांची म्हाडा कॉलनी परिसरात सुपारीची झाडे असून, ते वडिलांना भेटण्यासाठी रोज येथे येत असत. इथे आल्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तो इथे खेळायचा, त्यानंतर घरी जायचा. तोही गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास खेळण्यासाठी येथे आला होता. गुरुवारी अचानक एका कारचा दरवाजा बंद झाल्याने बराच वेळ हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा उघडला नाही.
बराच वेळ होऊनही मुलगा न दिसल्याने कबीरच्या वडिलांनी परिसरात त्याचा शोघ घेतला, घरी फोन करून चौकशी केली, मात्र, तो घरीही गेला नाही. गॅरेजमधील काही कर्मचाऱ्यांनी कबीर येथे खेळताना पाहिले होते. त्यामुळे त्यांनी कारमध्ये त्याचा शोध घेतला असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती नवधर पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.