मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केलेल्या तपासात दुर्घटनाग्रस्त होर्डिंगसाठीची सुमारे ४० लाखांची सुरक्षा ठेव इगो मीडिया प्रा. लि. कंपनीने भरलीच नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या माजी संचालक जान्हवी मराठे-सोनलकर हिच्या चौकशीतून ही बाब उघड झाली असून गुन्हे शाखा याबाबत अधिक तपास करत आहे.
गुन्हे शाखेच्या एसआयटीने याप्रकरणात आतापर्यंत इगो मीडिया प्रा. लि. कंपनीचा संचालक भावेश भिंडे आणि जान्हवी मराठे यांच्यासह स्ट्रक्चरल ऑडिटर मनोज रामकृष्ण संधू आणि कंत्राटदार सागर कुंभार अशा चार आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्यातील कागदपत्रे आणि अटक आरोपींकडील चौकशीच्या आधारे गुन्हे शाखेचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.
घाटकोपरमधील त्या अनधिकृत दुर्घटनाग्रस्त होर्डिंगची बेकायदेशीररीत्या परवानगी मिळवताना कंपनीने रेल्वेला ४०० टक्के अधिक महसूल प्राप्त होईल, अशा पद्धतीचे पत्र दिले होते; पण मंजूर झालेल्या निविदेतील अटी शर्तीचे त्यांनी उल्लंघन केले. त्यात होर्डिंगसाठी सुमारे ४० लाख रुपयांची सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक होते. मात्र, ही रक्कम देखील जमाच केली नसल्याची माहिती तपासात समोर आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.