मुंबई : मुंबईतल्या वडाळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे एका कारने 4 वर्षाच्या मुलाला कार मागे घेत असताना धडक दिली. या अपघात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आयुष लक्ष्मण किनवाडे असं अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. संदीप गोळे असं पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, किनवाडे परिवार वडाळा ब्रिजवर असलेल्या झोपडीत वास्तव्यास आहे. मुंबईच्या वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज जवळ गोळे हा त्याची गाडी मागे घेत होता. यावेळी रस्त्यावर खेळत असणाऱ्या आयुषला आरोपीने चिरडले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणी चालक संदीप गोळेला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुकल्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोपी संदीप गोळे विलेपार्ले येथील रहिवासी आहे. अपघाताच्या वेळी चालक दारूच्या नशेत होता का ? याचा तपास पोलिस करत आहेत.