मुंबई: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनदरम्यानच्या महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान प्रवाशांना इच्छित स्थळ गाठण्यासाठी कोणतीही दगदग करावी लागू नये, तसेच प्रवास सुसह्य व्हावा, यासाठी ४ स्थानके स्मार्ट करण्याचा निर्णय नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने घेतला आहे. मुंबई ते अहमदाबाद या ५०८ किमी. लांबीच्या मार्गावर ठाणे, विरार, सुरत आणि साबरमती ही स्थानके स्मार्ट होणार आहेत.
प्रवासानुरूप विकास अर्थात ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट म्हणजेच टीओडी म्हटले जाते, या योजनेत स्थानकाच्या आसपासच्या भागांचा नियोजनात्मक विकास करण्यात येतो. स्थानकांमध्ये ये-जा करणे, दुकानाची जागा, गर्दी कमी करणे, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नियोजन करणे अपेक्षित आहे. स्टेशनपासून ८०० मीटरपर्यंतचा परिसर तीन टप्प्यांत विकसित केला जाईल. पहिल्या टप्प्यात स्टेशनच्या आजूबाजूच्या २०० मीटरचा परिसर, पीकअप आणि ड्रॉपऑफ, पार्किंग, एक पॅसेंजर प्लाझा आदींचा समावेश आहे.
दुसऱ्या टप्प्यात, स्टेशनपासून २००-५०० मीटर अंतरावर स्टेशनपर्यंतच्या रस्त्याच्या संपर्कात सुधारणा दिसून येईल. हा टप्पा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १० वर्षांत पूर्ण केला जाईल. प्रवाशांचा प्रवास सुसह्य व्हावा, यासाठी स्थानके रेल्वे, मेट्रो, बस, टॅक्सी आणि ऑटो यासारख्या प्रवासाच्या इतर पद्धतींशी जोडले जाणार आहे. अशा अंतर्गत जोडणीमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, सुलभता वाढेल आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन मिळणार आहे. २०२६ च्या मध्यापर्यंत सुरत आणि बिलिमोरा, सुमारे ५० किमी अंतरावरील चाचणी सुरू होण्याची अपेक्षा आहे. मार्गावरील १२ स्थानके बांधकामाच्या विविध टप्प्यांत आहेत.