मुंबई : ७ सप्टेंबर रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या १३०१ बसेस गट आरक्षणासह एकूण २०३१ जादा बसेस आतापर्यंत फुल झाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये तिकीट दरात अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकांतून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. मुंबईतून चाकरमान्यांना कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्तीपर्यंत फक्त एसटीच सुखरूप पोहोचवते. यंदा एसटीतर्फे ४३०० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.