मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 4.30 वाजता सुरू केलं. त्यानंतर पहिला धक्का ठाकरे गटाला दिला. राहुल नार्वेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेची 1999 सालची घटना वैध असून 2018 साली ठाकरेंनी केलेली घटनादुरूस्ती मान्य नसल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले. 1999 सालची घटना शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे दाखल झालेल्या अभिलेखावर असलेली एकमेव घटना असल्याचं ते म्हणाले.
”2018 सालची घटना ग्राह्य धरण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. पण, 2018 सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची 1999 सालची घटना असून तीच ग्राह्य धरली जाईल. 2018 सालची घटना ग्राह्य धरा ही ठाकरे गटाची मागणी अमान्य करण्यात आली आहे.”, असं विधानसभा अध्यक्षांनी निकालवाचनात स्पष्ट केलं आहे.
नेतृत्वाची रचना तपासण्यापुरतंच पक्षाच्या घटनेचा आधार घेतल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले. त्याचा आधार घेऊन अपात्रतेचा निर्णय घेण्याआधी शिवसेना कुणाची याचा निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणाले. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून घटना मागितली गेली, पण दोन्ही गटांकडून घटना प्राप्त झाली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेली शिवसेनेच्या घटनेची प्रत ग्राह्य धरली जाईल. शिवसेनेच्या घटनेत 2018 साली करण्यात आलेली दुरुस्ती ग्राह्य धरता येणार नाही.