कसारा : कसारा घाटातील चिंतामण वाडी पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलीसांनी नाकाबंदी दरम्यान नाशिकहून मुंबईकडे जाणारे चारचाकी वाहनात दोन कोटींची रक्कम मिळून आली आहे. आज बुधवार (दि. 30) रोजी मुंबई-नाशिक महामार्गावर ही रक्कम जप्त करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चिंतामण पोलिस चौकी जवळ स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी सुरु आहे. यावेळी नाशिकहून मुंबईकडे जाणारे चारचाकी वाहनात ( MH 11 BV 9708) रोख रक्कम आढळून आली आहे.
अंदाजे २ कोटी रुपयांच्या आसपास ही रक्कम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. ही सर्व रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सदर वाहन ताब्यात घेऊन भरारी पथकांकडून पैसे मोजण्याचे काम सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव व निवडणूक भरारी पथकाकडून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, पुन्हा एकदा मोठी रक्कम आढळून आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.