मुंबई : 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता केली आहे. यासह इरफान आणि हमीदुद्दीन यांना दोषी घोषित करण्यात आले आहे. राजस्थानमधील अजमेरच्या टाडा कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
1993 मध्ये मुंबई, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि लखनऊच्या काही ट्रेनमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले होते. या प्रकरणी अब्दुल करीम टुंडा, इरफान आणि हमीमुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. या घटनेला 31 वर्ष उलटले. तरीही न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागेले होते. अब्दुल करीम टुंडा याला 2013 मध्ये नेपाळ सीमेवरून पकडण्यात आले होते. या सर्व आरोपींविरुद्ध टाडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची साक्ष नोंदवण्यात आली होती.
टुंडाला 2013मध्ये अटक
सीबीआयने टुंडाला या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड मानत 2013 मध्ये नेपाळ सीमेवरून त्याला अटक केले होते. टुंडावर देशात विविध ठिकाणी दहशतवादाचे खटले प्रलंबित आहेत. या खटल्यांमध्ये टुंडाने तरुणांना भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. जुनैद या पाकिस्तानी नागरिकासह त्याने 1998 मध्ये गणेशोत्सवादरम्यान दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती असेही बोलले जात आहे.
कोण आहे टुंडा?
दिल्लीतील दर्यागंजमधील छत्तालाल मियाँ भागात एका गरीब कुटुंबात टुंडाचा जन्म झाला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील पिलखुआ गावातील बाजार खुर्द भागात आपल्या मूळ गावी त्याचे वडील सुतारकाम करत होते. नंतर तो वडीलांना कामात मदत करू लागला. वडिलांच्या मृत्यूनंतर टुंडाने उदरनिर्वाहासाठी भंगाराचे काम सुरू केले. त्याशिवाय, कपड्यांचा व्यवसायही केला होता. तो कट्टरपंथी जिहादी दहशतवादीही होता. 80 च्या दशकात तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लष्कर-ए-तैयबाच्या संपर्कात आला. टुंडाने आयएसआयकडून दहशत पसरवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा दावाही केला जात आहे. त्यानंतर त्याने मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी होण्यापूर्वी जलीस अन्सारी सोबत मुंबईतील मुस्लिम समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने ‘तन्झीम इस्लाह-उल-मुस्लिमीन’ या संघटनेची स्थापना केली होती.