बदलापूर : बदलापुरातील दोन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचे पडसात राज्यभर उमटले होते. बदलापुरात संतापाचं वातावरण असतानाच आता बदलापूरमध्ये एका पित्याने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत या नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.
एका वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून 54 वर्षीय आरोपी त्याच्या 15 वर्षांच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करीत होता. त्यादिवशी 22 ऑगस्ट रोजीही पुन्हा एकदा बापानेच लेकीवर बलात्कार केला. यानंतर ती घाबरून घरातून निघून गेली. रात्री उशीरा ती घरी परतली. त्यानंतर सोमवारी तिने वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तो फरार झाल्यामुळे त्याचा शोध सुरु आहे.
पीडित मुलगी आणि तिचं कुटुंब उत्तर प्रदेशमधील राहणारे असून, गेल्या काही वर्षांपासून बदलापुरात वास्तव्याला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये आरोपी वडिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.
अल्पवयीन मुलीच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (लैगिंक अत्याचार), 74 (महिलेवर अत्याचार किंवा गुन्हेगारी बळजबरी करणे) आणि 75 (लैंगिक छळ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. कलम 118 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात महिलांवरील अत्याचार तसेच विनयभंगाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सरकारकडून कडक कारवाईसाठी पाऊले उचलली जात आहे.