ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. भिवंडीतील बाहत्तर गाला परीसरात असलेल्या एका चार मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचा स्लॅब अचानक कोसळला. या घटनेत घरात झोपलेल्या 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किसन पटेल असं या मृत मुलाचे नाव आहे. लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आईने टाहो फोडला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
भिवंडीतील बाहत्तर गाला परीसरात असलेल्या इमारतींमधील अनेक फ्लॅटची अवस्था बिकट झाली आहे. घरात झोपेत असताना अचानक स्लॅब अंगावर पडल्याने दुखापत झाल्याने 15 वर्षीय किसन हा गंभीर जखमी झाला. किसनला तात्काळ जखमी अवस्थेत जवळील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या संदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत.
एका निष्पाप जीवाचा बळी
या इमारतीमधील फ्लॅटमध्ये याआधी देखील स्लॅब पडल्याने मृत मुलाची आई जखमी झाली होती. तेव्हा इमारतीत दुरुस्ती करण्यासाठी घरमालक भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश टावरे यांच्या हे कुटुंब गेले होते. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने पुन्हा फ्लॅटमधील स्लॅब पडल्याने एका निष्पाप जीवाचा बळी गेल्याचे बोलले जात आहे.
तर माझा मुलगा जिवंत असता; आईची आर्त हाक
मुलाच्या आईने घटनेनंतर टाहो फोडताना आर्त हाक दिली, जर वेळेत घरची दुरुस्ती केली असती तर आज माझा मुलगा जिवंत असता, असं आईने म्हटले आहे. आईचे हे शब्द ऐकून उपस्थितांचेही डोळे पाणावले.