ठाणे : उल्हासनगर कोर्टाने गणपत गायकवाड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे गायकवाड यांचा आता 14 दिवसांचा मुक्काम पोलीस कोठडीत राहणार आहे. प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्याची चौकशी करायची आहे. त्यासाठी पोलिसांनी गायकवाड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गायकवाड यांच्या आवाजाचे नमुनेही घ्यायचे आहेत. त्यामुळे 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. कोर्टाने ही मागणी मान्य केली आहे.
सुनावणीत काय झालं?
उल्हासनगर कोर्टात प्रत्यक्षात गणपत गायकवाड यांना हजर करण्यात आले होते. न्यायाधीश ए.ए निकम यांच्या बेंचसमोर सुनावणी झाली. गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी कोर्टात दिली. त्यांची बंदूक पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणात आम्हाला सखोल चौकशी करायची असून फरार आरोपींचा देखील आम्हाला शोध घ्यायचा आहे, असंही पोलिसांनी कोर्टात सांगितलं.
गणपत गायकवाड यांच्या वकिलांचा आक्षेप
गोळीबाराच्या घटनेचं सीसीटीव्ही कसे बाहेर गेले? असा सवाल गणपत गायकवाड यांचे वकिल राहुल आरोटे यांनी कोर्टात उपस्थित केला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कॅबिनमधील सीसीटीव्ही लिक होते. हे जाणून बुजून करण्यात आले, असा दावा देखील वकिलांनी यावेळी केला. तसेच महेश गायकवाड यांना 6 गोळ्या लागल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला, त्यावरही गणपत गायकवाड यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता.
नेमक काय प्रकरण?
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गायकवाड यांनी हा गोळीबार केला. हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती मिळत आहे.