मुंबई : १ जानेवारी २०२४ पासून ऑनलाइन आरक्षण प्रणाली अद्ययावत करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला उदंड प्रतिसाद मिळत आहे. १ जानेवारी २०२४ ते २० मे २०२४ पर्यंत १२ लाख ९२ हजार इतक्या तिकिटांची विक्री या नव्या ऑनलाइन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे. याच काळात मागील वर्षी ९ लाख ७५ हजार तिकिटांची विक्री झाली होती. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे ३ लाखांनी जास्त आहे. सध्या या ऑनलाइन आरक्षण प्रणालीद्वारे दररोज १० हजार तिकिटे काढली जात आहेत.
प्रवाशांना घरबसल्या एसटीचे तिकीट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एसटीने आपल्या npublic.msrtcors.com अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन तिकीट आरक्षण करण्याची सोय केली आहे. तसेच मोबाईलवर MSRTC Bus Reservation अॅपच्या माध्यमातून देखील प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पद्धतीद्वारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये १ जानेवारी २०२४ पासून आमूलाग्र बदल करून त्या अद्ययावत करण्यात आल्या. परिणामी त्यातील अनेक दोषांचे निर्मूलन झाल्याने ही ऑनलाइन आरक्षण प्रणाली प्रवाशांना वापरण्यास अत्यंत सोपी व सुलभ झाली आहे. तसेच या दोन्ही प्रणालीद्वारे प्रवाशांना अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांग व्यक्ती अशा विविध सवलतींचेदेखील आगाऊ आरक्षण मिळू शकते. त्यासाठी महामंडळाने अधिकृत संकेतस्थळाबरोबरच MSRTC Bus Reservation अॅपचा वापर प्रवाशांनी करावा, असे आवाहन केले आहे.
तथापि, ऑनलाइन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास ७७३८०८७१०३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. हा नंबर प्रवाशांना तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी २४ तास सुरू असणार आहे. तसेच ऑनलाइन आरक्षण करताना पैसे भरूनदेखील तिकिटे न येणे (पेमेंट गेटवेसंदर्भात) या तक्रारींसाठी ०१२०४४५६४५६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.