मुंबई : वांद्रे येथील भरधाव बेस्ट बस अपघातात बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा शाळेतून घरी जाताना भरधाव वेगाने येणा-या बस अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. खेरवाडी पोलीस ठाण्याजवळ असलेल्या शासकीय वसाहतीच्या मैदानाजवळ हा अपघात झाला. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे.
मोहम्मद अरबाज शकील अन्सारी (वय-12) असे अपघातात मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहावीत शिकणारा मोहम्मद त्यावेळी वांद्रे वसाहत भागातील कार्डिनल ग्रेशिअस शाळेतून नेहमीप्रमाणे मित्रांसोबत वाल्मिकी नगर येथील घरी परत निघाला होता. आपल्या मित्रांसह रस्ता ओलांडत असताना बसने उजव्या बाजूने मोहम्मदला धडक दिली. उपचासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले. 599 क्रमांकाची बेस्ट बस वांद्रे रेक्लेमेशन येथील वांद्रे डेपोतून टाटा कॉलनी (वांद्रे) येथे जात असताना हा अपघात झाला.
बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बस कंडक्टरने मुलाला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि अपघातानंतर त्याला रुग्णालयात नेले. परंतु दुर्दैवाने, त्याला रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले. या घटनेबाबत चालकाची चौकशी केली जात आहे.
बेस्ट बस चालक विजय बागल (वय-45) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 106 अन्वये (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि 281 (रॅश ड्रायव्हिंग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपीला आज वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.