German Shepherd Attacks : मुंबईच्या अंधेरी (पूर्व) एमआयडीसी परिसरातील लोढा एटर्निस सोसायटीतील जर्मन शेफर्ड कुत्र्याने10 वर्षांच्या मुलीवर हल्ला केला. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली. यानंतर मुलीला तात्काळ हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या मुलीवर दोन तास ऑपरेशन करून तब्बल 45 टाके घालावे लागले. दरम्यान, परिसरातील नागरिकांवर एकाच कुत्र्याने हल्ला केल्याची ही तिसरी घटना आहे. (German Shepherd Dog)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 27 नोव्हेंबर ला बिल्डिंगच्या खाली मुलगी खेळत असताना कुत्र्याने मुलीला अचानक चावा घेतला. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली. शेजाऱ्यांनी पालक, रुपेश आणि झिंगिंग कुमार यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, जखमी मुलीवर दोन तास शस्त्रक्रिया करून तब्बल 45 टाके पडले आहेत.
कुत्र्याच्या मालकाला सांगूनही वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे निराश झालेल्या कुमार यांनी 30 नोव्हेंबर रोजी कुत्र्यांच्या मालकांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 154 नुसार एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी कुत्र्याच्या मालकाने मुलीच्या कुटुंबियांची माफी मागितली नाही. उलट प्रति-एफआयआरची धमकी दिली आहे. निवासी संकुलांमध्ये पाळीव प्राण्यांमुळे सोसायटीतील रहिवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.