मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून पुढच्या काही दिवसांत 288 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना आश्वासनं दिली जात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी भाजपाकडून त्यांचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर आता महाविकास आघाडीने त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्याला ‘महाराष्ट्रनामा’ असं नाव देण्यात आलं आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा महाराष्ट्रनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला, तरुण आणि आरोग्य क्षेत्राच्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासनांची लयलूट करण्यात आली आहे. मुंबईत आज महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित करत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या ( शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत उपस्थित होते.
दरम्यान, यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने आणि देशाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच गौरव पुन्हा स्थापित करण्यासाठी हा महाराष्ट्रनामा आहे. पाच गॅरंटी आधी जाहीर केलेल्या आहेत. सामाजिक बदलांमध्ये महाराष्ट्र सर्वात आधी आहे. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक महत्वाची आहे. आताच्या सरकारला सत्तेतून हटवलं तर आम्हाला चांगलं सरकार देता येईल, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?
- महालक्षी योजनानुसार महिलांना तीन हजार प्रतिमहिना देणार
- महिलांसाठी बस प्रवास मोफत करणार
- 6 गॅस सिलिंडर प्रत्येकी 500 रुपयांत उपलब्ध करून देणार
- महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार
- महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये 2 दिवसांची ऐच्छिक रजा देणार
- जन्मलेल्या प्रत्येत मुलीच्या नावे ठरावीक रक्कम बॅंकेत ठेवणार, 18 वर्षांनंतर लाख रुपये देणार
- सुशिक्षित बेरोजगारांना दरमहिना 4 हजार रुपयांपर्यंत भत्ता देणार
- शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देणार
- नियामित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत सूट देणार
- राज्य सरकारच्या अडीच लाख जागांची भरती प्रक्रिया सुरु कऱणार
- एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करून 45 दिवसांत निकाल जाहीर करणार
- महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या वर नेणार
- संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दीड हजारांऐवजी 2 हजार देणार
- 300 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांचे 100 युनिटपर्यंतचे वीजबील माफ करणार
- सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
- महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार
- महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील याना भारतरत्न देण्याची मागणी करणार
- शिवभोजन थाळी योजना केंद्राची संख्या वाढणार
- सरकारी रुग्णालयात मोफत औषध उपलब्ध करून देणार
- राज्यात सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार