उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये आमदार गणपत गायकवाड समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या ३० ते ४० कार्यकर्त्यांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणी शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलं होत. त्यापूर्वी कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी गायकवाड समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती.
दरम्यान, आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगरच्या कोर्टात शनिवारी हजर करण्यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये घेऊन येत असताना कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनाई आदेशाचे उल्लंघन केले.
हे सर्व कार्यकर्ते गोळीबार प्रकरणी आरोपी असलेल्या आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनासाठी उल्हासनगरच्या चोपडा कोर्टाबाहेर घोषणाबाजी करत होते. त्यामुळे भाजपाच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांवर उल्हासनगरच्या सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.