मुंबई: 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा राजकारणात उतरला आहे. गुरुवारी मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बॉलिवूड अभिनेता गोविंदाने शिवसेनेत प्रवेश केला. गोविंदा उत्तर-पश्चिम मुंबईतून शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गटाच्या) तिकिटावर निवडणूक लढवू शकतो, ज्यामध्ये तो शिवसेना (यूबीटी) उमेदवार अमोल कीर्तिकर यांनाआव्हान देऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.
अलीकडेच अभिनेता गोविंदाने महारा ष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीपासूनच गोविंदाच्या राजकारणातील प्रवेशाच्या अटकळींना वेग आला होता. आज शिंदे कॅम्पचे प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी अभिनेता गोविंदाची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली, त्यानंतर गोविंदा शिवसेनेत प्रवेश करू शकेल, असे मानले जात होते.
गोविंदाने 2004 मध्ये काँग्रेसच्या वतीने मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपचे दिग्गज नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. तथापि, गोविंदाने नंतर काँग्रेस पक्षापासून फारकत घेतली आणि 2009 ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. शिंदे गटात गेल्यानंतर गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. गेल्या 14 वर्षांच्या वनवासानंतर आता पुन्हा राजकारणात प्रवेश करतोय असं तो म्हणाला.