आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात गॅस सिलेंडर असेलच. पण तो वापरताना काही गोष्टींची योग्य काळजी घेतल्यास भविष्यात होणारा धोका टाळता येऊ शकतो. जर त्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला मोठा फटकाही बसू शकतो. त्यामुळे गॅस सिलेंडर वापरताना सतर्क राहणे गरजेचे बनले आहे.
सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे सिलेंडरचा रेग्युलेटर योग्यप्रकारे बसला आहे की नाही हे आधी तपासा. त्यातून गॅस लिकेजचा बारीक आवाज किंवा वास येत असल्यास तात्काळ कंपनीला कळवा. गॅस सिलेंडर नेहमी उघड्या जागी ठेवावे. कपाटासारख्या बंदिस्त जागी ठेवू नये. गॅस सिलेंडर वापरात नसेल तर त्याची सेफ्टी कॅप त्यावर लावून ठेवावी. तसेच सिलेंडर ठेवण्यासाठी चाकाच्या ट्रॉली वापरू नयेत. सिलेंडरचा रेग्युलेटर व्यवस्थित बसला आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यावर साबणाचे पाणी टाकून बुडबुडे येतात का ते पहावे.
याशिवाय, गॅस पुरवठा करणारी रबरी नळी दीड मीटरपेक्षा जास्त लांब असू नये. या नळीला कुठं चिरा पडलेल्या आहेत की नाही हे वारंवार पाहावे. या नळीवर उकळते पाणी किंवा गरम तेल पडणार नाही, याची काळजी घ्यावी. गॅसची शेगडी सिलेंडरपेक्षा उंच असावी.
गॅसची शेगडी जमिनीपासून कमीत कमी दोन फुटांवर असावी. गॅस सिलेंडरच्या बाजूला वर्तमानपत्राची रद्दी, जुने कपडे, प्लास्टिकच्या पिशव्या ठेवू नयेत. यांसारख्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास भविष्यातील धोका टाळता येऊ शकतो.