पुणे : सध्या नवी दुचाकी असो वा चारचाकी अनेक वाहनांच्या किमती वाढल्या आहेत. या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. असे असताना जर तुम्ही स्वतःसाठी जुनी अर्थात ‘सेकंड हँड बाईक’ शोधत असाल तर काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. जुनी बाईक घेण्यापूर्वी त्याची राईड तर आपण घेतोच याशिवाय काही गोष्टी तपासणे गरजेचे आहे.
जर तुम्ही या पावसाळ्यात जुनी बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कोणती बाईक योग्य असेल ते आधी ठरवा. वास्तविक, बाईकमध्ये अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये स्ट्रीट, नेकेड, स्पोर्ट्स, ॲडव्हेंचर अशा बाईक्स आहेत. पण तुम्हाला कोणत्या कारणासाठी ही बाईक हवी हे ठरवूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. ‘सेकंड हँड बाईक’चा काही ना काही भाग खराब झाल्याचे अनेकदा दिसून येते. अशा परिस्थितीत, ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करण्यापूर्वी, एकदा बाईकची योग्यरित्या तपासणी करावी.
बाईकचे सर्व भाग व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे बारकाईने तपासा. कोणत्याही भागामध्ये काही समस्या असल्यास डिलर किंवा दुचाकी विक्रेत्यास त्वरित कळवा. सेकंड हँड बाईक घेताना बाईकची सर्व कागदपत्रे आणि सर्व्हिस हिस्ट्री जरूर विचारा. जेणेकरून पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. जर बाईकच्या विक्रेत्याने मूळ कागदपत्रे आणि सर्व्हिस हिस्ट्रीची माहिती देण्यास नकार दिला तर काहीतरी चूक होऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध होऊन योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.