फिरायला जाणे हे अनेकांना आवडत असतं. त्यासाठी कुठं जायचं असेल तर सगळं प्लॅनिंगदेखील केलं जातं. पण तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला स्वित्झर्लंड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. स्वित्झर्लंड नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे बर्फाच्छादित टेकड्या, तलाव, धबधबे आणि सुंदर हिरवळ जणू स्वर्गच वाटतात.
भारत ते स्वित्झर्लंड हे अंतर अंदाजे 6178 किमी आहे. तुम्ही नवी दिल्ली ते स्वित्झर्लंडपर्यंत फ्लाईटने जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला सुमारे साडेअकरा तासांचा प्रवास करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही तेथे पोहोचू शकता. नवी दिल्ली ते स्वित्झर्लंडपर्यंत स्वस्त विमान तिकिटे अनेक वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ‘ऑफ सीझन’मध्ये प्रवास करताना तिकीट आणि राहण्याची व्यवस्था कमी किमतीत होऊ शकते. त्यामुळे या दिवसांत जाण्याला प्राधान्य द्यावं.
भारतातून स्वित्झर्लंडला जाण्यासाठी विमानाच्या तिकिटाची किंमत प्रति व्यक्ती सुमारे 30 हजार रुपये असू शकते. दिवस आणि सुट्ट्यांनुसार यामध्ये काही फरक जाणवू शकतो. फ्लाईट तिकिटांव्यतिरिक्त बजेट हॉटेल्स आधीच ऑनलाईन बुक करावे लागेल.
तुम्हाला स्वस्तात अनेक बजेट फ्रेंडली हॉटेल्स, होमस्टे किंवा गेस्ट हाऊस मिळतील. याशिवाय, स्वित्झर्लंडमध्ये प्रवास करण्यासाठी, तुम्ही सार्वजनिक वाहतूक वापरू शकता जी कार किंवा टॅक्सीपेक्षा स्वस्त आहे. स्विस ट्रॅव्हल पासही बनवता येतो.