भारतात अनेक जाती-धर्म आहेत. त्यांच्या परंपराही बऱ्याच आहेत. त्यात कार्तिक महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि धार्मिक महत्त्वाचा काळ मानला जातो. या महिन्यात स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व आहे. विशेषत: पवित्र नद्या, तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थळांवर स्नान करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.
भारतात अशा काही नद्या आहेत त्या पवित्र मानल्या जातात. त्यात गंगा नदीचा समावेश आहे. गंगा नदी ही मोक्ष देणारी नदी मानली जाते. कार्तिक महिन्यात हरिद्वार, वाराणसी, प्रयागराज, ऋषिकेश येथे स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी भावना आहे. विशेषत: वाराणसी आणि प्रयागराजमध्ये स्नान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते.
तसेच यमुना नदीचा संबंध भगवान श्रीकृष्णाशी असून, कार्तिक महिन्यात मथुरा, वृंदावन यमुना स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या नदीत स्नान केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि मन शुद्ध होते. याशिवाय, अयोध्येतील शरयू नदीचे धार्मिक महत्त्व प्रभू रामाशी संबंधित आहे. कार्तिक महिन्यात शरयू नदीत स्नान केल्याने रामाची कृपा होते आणि सर्व पापांचा नाश होतो, अशी देखील भावना आहे.