आपल्या देशात सर्वाधिक विस्तार झालाय तो भारतीय रेल्वेचा. ही रेल्वे देशातील अनेक राज्यांना, शहरांना, गावांना जोडण्याचे काम करते. सर्वात आरामदायी आणि कमी दरात असणारा प्रवास म्हणजे रेल्वे प्रवास. याच रेल्वेच्या अनेक रंजक अशा बाबीदेखील वेळोवेळी समोर येत आहेत. तुम्हाला माहितीये का देशात असे एक रेल्वे स्टेशन आहे ते दोन राज्यांमध्ये विभागलं गेलं आहे.
भवानी मंडी हे भारतातील एक असे रेल्वे स्टेशन आहे, जिथे अर्धी ट्रेन एका राज्यात आणि अर्धी ट्रेन दुसऱ्या राज्यात थांबवली जाते. हे शहर जितके अनोखे आहे, तितकेच इथले रेल्वे स्टेशनही अप्रतिम आहे. हे रेल्वे स्टेशन राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात येते. हे स्टेशन राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये विभागलेले आहे. या स्टेशनची खास गोष्ट म्हणजे तिकीट देणारा मध्य प्रदेशात तर तिकीट घेणारा राजस्थानात उभा असतो. एवढेच नाही तर या रेल्वे स्थानकाच्या एका टोकाला राजस्थान दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशचा साईन बोर्ड आहे.
भवानी मंडी शहरात काही लोकांच्या घराचा मुख्य दरवाजा उघडतो, तर मागचा दरवाजा मध्य प्रदेशातील भैसोंडा मंडीत उघडतो. त्यामुळे दोन्ही राज्यातील लोकांमध्ये परस्पर प्रेम आणि सौहार्द दिसून येते. इतकेच नाहीतर दोन्ही राज्यातील लोकांच्या बाजारपेठदेखील एकच आहे.