सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या पावसाळ्यातच अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं. त्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष नक्की द्या. त्याने फायदा होऊ शकतो. पावसाळ्यात आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही बाहेरचं खात असाल तर ते देखील टाळणं गरजेचं आहे.
पावसाळ्यात डासांची पैदासही वाढते. त्यामुळे या दिवसांमध्ये मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजारांचा धोका वाढतो. पावसाळ्यामध्ये अनेक संसर्गजन्य बॅक्टेरियांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे आधीपासून कापलेल्या फळांचे सेवन अजिबात करू नका. तसेच दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉईड यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये खाण्या- पिण्याबाबत सतर्क राहणे आवश्यक असते.
पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या स्टॉल्सवरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे पावसाचे पाणी त्या पदार्थांमध्ये जाण्याची शक्यता असते. तसेच इतर कीटकही त्या पदार्थांवर बसू शकतात. परिणामी, अनेक हानिकारक बॅक्टेरियांचा या पदार्थांवर समावेश होऊ शकतो.
पावसाळ्यामध्ये फळांवर, भाज्यांवर खास करून हिरव्या पालेभाज्यांवर कीटक असू शकतात. त्यामुळे या भाज्यांचे सेवन करणे टाळा. तसेच या भाज्यांचा आहारात समावेश करत असाल तर व्यवस्थित पाहून, स्वच्छ करून त्यानंतरच करा.