पुणे प्राईम न्यूज : सध्या लहान मुलांवरील अत्याचाराची, लैंगिक शोषणाची प्रकरणे वाढत आहेत. अशावेळी मुलांचे पालक म्हणून तुम्ही मुलांच्या सुरक्षेसाठी काही खास पाऊले उचलायला हवीत. सध्याच्या काळात ज्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टी प्रत्येक आईने तिच्या मुलांना शिकवायलाच पाहिजेत. जर तुम्ही देखील आई असाल तर तुम्ही तुमच्या मुलांना आवर्जून कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात…
चांगला स्पर्श वाईट स्पर्श म्हणजे काय?
जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला स्पर्श करतो आणि तेव्हा तुम्हाला त्यातून प्रेमाची भावना कळते किंवा खूप चांगले वाटते किंवा त्या स्पर्शाने सुरक्षित वाटते. तर अशा स्पर्शाला चांगला स्पर्श म्हणतात. तर वाईट स्पर्श हा चांगल्या स्पर्शापेक्षा उलट असतो. ज्या स्पर्शामुळे त्रास होतो किंवा आपल्याला यात काहीतरी चुकीचे होते आहे असे वाटते तो स्पर्श वाईट आहे असं समजावं.
सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ लव्ह
सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ लव्ह या दोन गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाला हव्या असतात पण खूप कमी लोक साध्य करू शकतात. स्वाभिमान म्हणजे काय आणि हे दोन्ही गुण त्यांनी स्वतःमध्ये कसे जोपासले पाहिजेत हे तुमच्या मुलाला समजावून सांगा.
आदर करणे
मुलाला लहानपणापासूनच इतरांचा आदर करायला शिकले पाहिजे. समोरची व्यक्ती श्रीमंत असो वा गरीब, लहान असो वा वृद्ध, स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाला आदर दिला पाहिजे. तसेच इतरांच्या भावनांचा आदर करायला शिकवा.
संवेदनशीलता
अनेकदा मुलं हुशार, सद्गुणी असतात पण ते संवेदनशील नसतात. लहानपणापासून मुलांना शिकवता येते. कुणाच्या गरिबीवर न हसणे, कुणाचे दु:ख समजून घेणे, कुणाचे दु:ख वाटून घेणे ही सुद्धा माणूस चांगला असण्याची लक्षणे असतात हे शिकवलं पाहिजे.