नवी दिल्ली : ओडिशाचे पुरी शहर हे जगन्नाथ रथयात्रेसाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते. येथील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक ठिकाणे आणि सुंदर समुद्रकिनारे केवळ भारतातील पर्यटकांनाच नव्हे तर परदेशातील पर्यटकांनाही मंत्रमुग्ध करतात.
जर तुम्ही देखील पुरी प्रवास करण्याचा विचार करत असाल, परंतु बजेटच्या कमतरतेमुळे हे स्वप्न अपूर्णच राहिले आहे, तर आता तुमच्याकडे सुवर्णसंधी असणार आहे. ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ने एक विशेष टूर पॅकेज आणले आहे. ज्या अंतर्गत तुम्ही कमी बजेटमध्ये पुरीला जाण्याचा आनंद घेऊ शकता. ओडिशाचे पुरी शहर भुवनेश्वरपासून केवळ 61 किलोमीटर अंतरावर आहे. या पवित्र शहरात भेट देण्यासाठी अनेक आकर्षक ठिकाणे आहेत, परंतु त्यांना भेट देण्यासाठी एक किंवा दोन दिवस पुरेसे नाहीत.
त्यामुळे IRCTC ने तुमच्यासाठी एक खास भेट आणली आहे. ‘दिव्य पुरी’ नावाचे हे खास टूर पॅकेज 3 रात्री आणि 4 दिवसांचे आहे, ज्यामध्ये तुम्हाला पुरीच्या सर्व प्रमुख ठिकाणांना एकत्र भेट देण्याची संधी मिळेल. या पॅकेजद्वारे तुम्ही केवळ जगन्नाथ मंदिरच नाही तर कोणार्क सूर्य मंदिर, चंद्रभागा बीच आणि इतर अनेक मंदिरांनाही भेट देऊ शकता.